जळगाव, दि. 28 – परिवर्तनतर्फे नुकतीच “साहित्यकृती व माध्यमांतर” या विषयावर चर्चा करण्यात आली. रंगकर्मी व अभिनेते सयाजी शिंदे यांनी साहित्य ही तशी वैयक्तीक वाचनाची बाब आहे. पण बदलत्या काळात विविध माध्यमातून साहित्याच माध्यमांतर होत आहे. सिनेमा, नाटक, अभिवाचन अशा विविध माध्यमातून वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. यात मूळ साहित्यात बदल होतात. पण आता “स्टोरी टेल” हे पण साहित्य पोहचवण्याच माध्यम आहे. त्यात मूळ साहित्यासोबत प्रामाणिक राहत, कुढलाही बदल न करता वाचन करण्यात येतं. यामुळे संपूर्ण कांदबरी थेट व पूर्ण पोहचते.
भालचंद्र नेमाडे यांच्या चांगदेव चतुष्टय या चार कांदबरी म्हणजे बिढार, हुल, जरीला, झुल या आता स्टोरी टेल या अॅपवर आल्या आहेत. रंगकर्मी शंभु पाटील यांनी या कादंबऱ्या वाचल्या आहेत . चांगदेव पाटील हा नायक जगण्याच्या अनेक स्तरावर संघर्ष करतो, आपली जातीत विखुरलेली सामाजिक व्यवस्था, त्याचा शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम, त्या मधून निर्माण झालेली असते तरुण पिढीची अवस्था याचं प्रतिबिंब चांगदेव चतुष्टय मध्ये आपल्याला दिसते. परात्म असलेला नायकाचे जीवन दर्शन हा त्या काळचा सामाजिक दस्तावेज आहे, असं मत जेष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी मांडलं.
तर कवी प्रकाश होळकर यांनी ‘बिढार’ मधील लिटिल मॅगझीन चळवळ व त्या अनुषंगाने साहित्य जगतामधील अनेक पैलू समोर आले. ध्येयवादी तरुण साहित्यिक त्यांची परिवर्तनशील चळवळ ह्याने एकूण साठोत्तरी साहित्याला दिलेलं वळण हा महत्वाचा विषय समोर आणला आहे. कवयित्री व प्रकाशक सुमती लांडे यांनी या माध्यमातून कांदबरी ऐकणं ही एक छान अनुभूती आहे असं सांगितलं.
या चर्चा सत्रानंतर परिवर्तनचे चित्रकार राजू बाविस्कर, विकास मलारा, विजय जैन या तिघांच्या चित्रांची निवड ललित कला अकादमी दिल्ली यांच्या 62 व्या राष्ट्रीय प्रदर्शनात झाली. या सोबतच या तिघांना ललित कला अकादमीच आजीवन सदस्यत्व देण्यात आलं आहे. या दुहेरी सन्मानाबद्दल या तीन चित्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
परिवर्तन दशकपुर्ती निमित्ताने जळगाव मधील 36 चित्रकारांनी एकत्र येऊन एक ब्लॅक अँड व्हाइट हे नव्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते. याच प्रदर्शनातील चित्रांची निवड ललित कला अकादमी दिल्ली यांनी केली. हा परिवर्तनचाच सन्मान आहे असं सयाजी शिंदे म्हणाले .
अशोकभाऊ जैन यांचे मार्गदर्शन व सहकार्य व परिवर्तनचा सातत्याने नाविन्याचा शोध यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळाली असं तिन्ही चित्रकारांनी आपल्या मनोगतात सांगितले. या प्रसंगी परिवर्तनचे शंभु पाटील, नारायण बाविस्कर, कवी अशोक कोतवाल, ज्ञानेश्वर शेंडे उपस्थित होते .