हेंकळवाडी येथील घटना ; ९ जणांवर गुन्हा
धुळे, (वृत्तसंस्था ) : कॉपर वायरच्या स्क्रैप खरेदीच्या बहाण्याने गुजरात राज्यातील बडोदा येथील व्यापाऱ्याला बोलावुन घेत त्याच्याकडील ६ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना हेंकळवाडी ता.धुळे, गावाजवळ घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात महिलेसह अज्ञात ९ जणांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात, कुणाल मनिलाल पटेल (३७) रा. आनंदबाग, सोसायटी, बडोदा गुजरात, यानी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नितीन भोसले नामक व्यक्तीने कॉपर वायरच्या स्क्रैप माल खरेदीचे अमिष दाखवून मालाची खात्री करण्याकरीता धुळे येथे बोलावून घेतले. त्यानुसार ते दि.५ रोजी सायंकाळी धुळ्यात आले. मात्र, संशयितांनी पूर्वनियोजित कट आखून मोटरसायकल (एमएच १८/ एयू-८२२६) वर दोन अज्ञात व्यक्तींना कुणाल पटेल यांना घेण्यासाठी पाठविले. ते वाहनातून मोटरसायकलसोबत जात असतांना सडगाव गावाच्या पुढे गेल्यावर हेंकळवाडी गावाजवळ अगोदरचे लपुन बसेलेल्या अनोळखी ६ ते ७ जणांनी त्यांना रस्त्यात गाठले.
एका अनोळखी महिलेने कुणाल पटेल व त्यांच्या साथीदारास वाहनातून बाहेर ओढले व हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील पाकीट, त्यातील पैसे, अंगावरील दागिने, अंगठ्या, ब्रेसलेट, गळ्यातील रुद्राक्ष माळ, सोन्याची रिंग, ४ मोबाईल हिसकावून घेतले. तसेच २ हजार रुपये अनोळखी व्यक्तीने त्यांच्या क्युआर कोडवर पेटीएमद्वारे ट्रान्सपर केले. असा एकूण ६ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटला. तसेच जिवेठार मारण्याची धमकी देवून संशयित पसार झाले. यावरुन अज्ञात ८ ते ९ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.