तळोदा येथील घटना
नंदुरबार ( वृत्तसंस्था ) : नंदुरबार जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली असून अंगणात खेळत असलेल्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ८ रोजी रोझवा प्लॉट (पुर्नरवसित, ता. तळोदा) येथे घडली. या हल्ल्यात अनुष्का जलसिंग पाडवी (वय २) या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. बालिकेवर स्मशानभूमी अभावी शेतातच अंत्यसंस्कार करावे लागल्याची वेळ नातेवाइकांवर आली.
सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या ७० कुटुंबांचे मोड जवळ (ता. तळोदा) येथे सन २०१६ मध्ये शासनाने पुनर्वसन केले आहे. बिबट्याचा हल्यात मयत झालेल्या बालिकेचा कुटुंबास देखील या वसाहतीत घर प्लॉटची जागा मिळाली आहे. तथापि या कुटुंबास रोझवा प्लॉट या ठिकाणी शेत जमीन शासनाकडून मिळाल्याने ते शेतातच झोपडी बांधून राहत आहेत. दोन वर्षीय अनुष्का हि चिमुकली आपल्या घराबाहेर खेळत असताना आई घरात कामे करीत होती अचानक आलेल्या बिबट्याने झडप घालून हल्ला केला व बालिकेला ओढूत नेले. ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत अनुष्काला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. झेलसिंग कुटुंबियांनी अनुष्काला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. रविवारी दुपारी मयत बालिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान बिबट्या आणि वाघाच्या हल्यात दोन मुलं व एक महिलेचा मृत्यू ओढवल्यानंतर वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आलेत. त्यात दोन दिवसात तीन बिबटे सापडले होते. आता मात्र पुन्हा हल्ला झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.