यावल तालुक्यातील कासवे येथील घटना
यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कासवे येथे शेतामध्ये निंदणी करीत असलेल्या शेतकऱ्याला साप चावल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कासवे येथील रहिवाशी उखा केशव कुऱ्हाडे वडार (वय ५८) असे मयत इसमाचे नाव आहे.
उखा कुऱ्हाडे यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. उखा कुऱ्हाडे हे दि.४ रोजी बटाईने केलेल्या शेतामध्ये निंदणीचे काम करत होते. त्यावेळी त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. त्यांना लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु शुक्रवारी त्यांचे निधन झाले.
घटनेची पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कासवे गावात हळहळ व्यक्त होत आहे.








