जळगाव, (प्रतिनिधी) : पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने दरवर्षी साजरा होणारा गणपती उत्सव हा पर्यावरण पूरक असावा या उद्देशाने बुधवारी दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी पर्यावरण पूरक शाडू मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा संत ज्ञानेश्वर विद्यालयात घेण्यात आली. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून श्री गणेशाच्या मूर्ती साकार केल्या. गेली ५ वर्षापासून ही कार्यशाळा घेतली जाते.
मुलांच्या संस्कारक्षम वयामध्ये जर त्यांच्यावर चांगले विचार रुजवता आले तर ते नेहमीच फायद्याचे ठरतात शाडूची माती नैसर्गिक व पर्यावरण पूरक असल्याने ह्या पासून बनवलेले गणपती लवकरात लवकर पाण्यामध्ये विरघळतात. शाडू माती बरोबरच मोठ्या प्रमाणात लोह असणाऱ्या लाल मातीचे गणपती गाईच्या शेणापासून बनवलेले गणपती, त्याचबरोबर कागदाचा लगदा व शाडू माती ह्याचे गणपती हे बऱ्याच अंशी पर्यावरणासाठी फायद्याचे आहेत.
शक्यतो शाडू किंवा लाल मातीचे बाप्पा घरी आणावेत अशा सूचना मुलांना दिल्या, तसेच थर्माकोल किंवा प्लास्टिकचा वापर आपण गणपती उत्सवामध्ये करू नये अशा प्रकारचे आवाहन मुलांना केले गेले व त्याचे दुष्परिणाम मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी समजावून सांगितले. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.