जळगाव (प्रतिनिधी ) : दीड लाखांची लाच स्वीकारतांना बीएचआर पतसंस्थेचा अवसायक चैतन्य नासरे यांच्यासह वसुली अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराची आई आणि मोठा भाऊ यांनी बीएचआरमधून कर्ज घेतलेले होते. याची ‘वन टाईम सेटलमेंट’ करण्यासाठी त्यांनी बीएचआरचे अवसायक चैतन्य नासरे यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांची वसुली अधिकारी सुनील पाटील यांच्याशी भेट झाली. त्यांनी या प्रकरणात दीड लाख रूपयांची लाच मागितली. चैतन्य नासरे यांनी देखील हे पैसे सुनील पाटील यांच्याकडे देण्याचे सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी संबंधीतांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. तेथील पथकाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी अवसायक चैतन्य हरीभाऊ नासरे व वसुली अधिकारी सुनील गोपीचंद पाटील या दोघांना बीएचआरच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. रात्री उशीरा त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.