गजानन पाटील | अमळनेर – यावर्षी जळगाव जिल्ह्यासह सह उत्तर महाराष्ट्रात ऑगस्ट महिना अर्धा झाला तरीही पाऊस नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी सर्वत्र पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अमळनेर तालुक्यातील वासरे गावातही गावाला पाणी पुरवठा करणारी विहिरीने तळ गाठल्याने पाणी टंचाई जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर येथील शेतकरी राजेंद्र शेनपडु पाटील हे स्वताच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्वखर्चाने गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून करीत आहे.
येथील गावात पाणी टंचाई जाणवू लागल्याने राजेंद्र पाटील यांनी कळमसरे येथील जय बाबारी भक्त परिवाराचे पाण्याचे टँकर मागवून त्याला स्वमालकीचे ट्रॅक्टर जोडून स्वताच्या मालकीच्या विहिरीतून गावातील प्रत्येक गल्लीत टँकरने पाणी पुरवठा करीत आहेत. यामुळे तात्पुरती का असेना पिण्याच्या पाण्याची सोय होत असून वासरेकरांना दिलासा मिळत आहे.
असा केला जातो पाणी पुरवठा..
राजेंद्र पाटील यांची खेडी रस्त्यावर स्वमालकीची शेती क्षेत्रात विहीर आहे. त्यांनी शेतात बागायती क्षेत्र कमी करून गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने दररोज शेतात जाऊन स्वखर्चाने टँकर भरून आणणे आणि गल्लीत उभे करून नळीच्या साहाय्याने प्रत्येक कुटुंबाला पिण्यासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देत आहेत. गेेेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून गावातील प्रत्येक गल्लीत पाणी पुरवठा केला जात आहे.
तालुक्यात पावसाअभावी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून पिके कोमेजली आहेत. मात्र अशाही परिस्थितीत राजेंद्र पाटील गावात टँकरने पाणी पुरवठा करीत असल्याने त्यांच्या या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकी जोपासल्याने ग्रामस्थ त्यांचे तोंड भरून कौतुक ही करीत आहेत.