जळगाव, दि. 24 – भारतीय साहित्य विश्वातील सर्वोच्च संस्था असलेल्या साहित्य अकादमीची फेलोशिप नुकतीच ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पद्मश्री भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाली. ही फेलोशिप अत्यंत मानाची व प्रतिष्ठेची समजली जाते. साहित्यातील विशेष कार्याबद्दलचा हा बहुमान असून भालचंद्र नेमाडे यांच्या रुपाने मराठी भाषेचा गौरव झाला आहे.
परिवर्तन जळगाव संस्थेच्या वतीने या सन्माबद्दल भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, जेष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आला. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले तर सयाजी शिंदे यांनी शाल अर्पण केली, अशोक भाऊ यांनी नेमाडे यांना पुस्तकं भेट दिली. याप्रसंगी जेष्ठ लेखिका सुमती लांडे, जेष्ठ रंगकर्मी व परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, प्रतिभा नेमाडे, जनमेजय नेमाडे, हर्षल पाटील, ओंकार पाटील, अविरत पाटील उपस्थित होते.