वरणगाव, (प्रतिनिधी ) : बंद घर फोडून घरातून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ३ लाख ५१ हजार ७५३ रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील मकरंद नगरात उघडकीस आली असून याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप भिका वाघ वय ४० रा. मकरंद नगर, वरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शेती व मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ते घराला कूलूप लावून कामानिमित्त निघून गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याने अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण १ लाख ५३ हजार ७५३ रूपयांचा ऐवज चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे २४ ऑगस्ट रोजी उघडकीस आले. याप्रकरणी सोमवारी २६ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जैन हे करीत आहे.