आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी ; दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश -गृहमंत्री
बदलापूर (वृत्तसंस्था ) : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी हा शाळेतील सफाई कर्मचारी असून त्याला अटक करण्यात आल्यानंतरही पालकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न यंत्रणांकडून झाल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येऊन संस्थेची चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलतांना दिली.
सदर प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून याचसाठी आज हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. बदलापूर शहरातील रिक्षाही आज बंद असून संतप्त बदलापूरकर प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर उतरत रेल रोको केला.
“बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे”, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवली आहे. “या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत,” असंही फडणवीसांनी सांगितलं आहे. तसेच सदर प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये म्हणजेच फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा प्रस्ताव माडण्याचे आदेश दिले जातील अशी माहिती फडणवीस यांनी दिली.