धरणगाव येथे पारितोषिक वितरण समारंभ
धरणगाव / जळगाव (प्रतिनिधी) : मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेची पट संख्या वाढवावी. प्रत्येक शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानासह अद्यावत राहावे. शिक्षकांनी ड्रेस कोड वापर करावा, पायी शिक्षण घेणाऱ्या मुलींना १ हजार सायकलींचे वाटप करण्यात येणार असून जिल्ह्यातील जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. बसविण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवून शाळेचा जिल्हा व राज्यस्तरावर नावलौकिक वाढवावा असे आवाहन करून माझी शाळा – सुंदर शाळा हे अभियान गुणवत्ता वाढीसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ते धरणगाव इंदिरा कन्या विद्यालय येथे शिक्षण विभागा मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत आयोजित “मुख्यमंत्री, माझी शाळ सुंदर शाळा” पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील हे होते.
शिक्षकांनी स्वतःला सिद्ध करण्याची गरज.- शिक्षणाधिकारी विकास पाटील
यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील म्हणाले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मधून 740 शाळाना वाल कंपाउंड बांधकाम, 6951 शाळांना विजेची सोय, पंखे व दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्यात 400 पेक्षा जास्त शाळांमध्ये सेमी वर्ग सुरु करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी नवीन शाळा खोल्या बांधकाम, शाळा वर्ग दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने शाळांना भौतिक सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी भूमिका घ्यावी व स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन केले.
या अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधून प्रथम क्र. झुरखेडा जिल्हा परिषद शाळा, द्वितीय क्रमांक- भोणे जिल्हा परिषद शाळा, तृतीय क्रमांक – अनोरे जि. प. प्राथमीक शाळा त्याचप्रमाणे इतर व्यवस्थापनाच्या शाळा अंतर्गत प्रथम क्रमांक- इंदिरा माध्यमिक विद्यालय, धरणगाव, द्वितीय क्रमांक-आर. डी. पाटील माध्यमिक विद्यालय, पथराड तर तृतीय क्रमांक- साळवे इंग्रजी शाळा, साळवे या विद्यालयाला मिळाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अनुक्रमे तीन लाख, दोन लाख व एक लाख रक्कम रुपये सह शिल्ड व प्रमाणपत्र त्या – त्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व सरपंच यांना देण्यात आले. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 91 शाळा व खाजगी 69 अश्या 160 शाळांनी या अभियानात सहभाग नोदवला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेयर तसेच मोठे पुस्तक इत्यादी साहित्याचे वाटप तसेच चित्रकला स्पर्षेत विजेत्या 16 विद्यार्थ्यांना पालकमंत्री यांनी प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉ . भावना भोसले यांनी केले, कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक किरण चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख प्रमोद पाटील यांनी केले.
या प्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, गट शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, तालुका प्रमुख, डी. ओ. पाटील, शाळा संस्थेचे चेअरमन सी. के. पाटील, मुख्याधिकारी जनार्दन पवार, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा पाटील, भानुदास विसावे, मोतीआप्पा पाटील यांच्यासह विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.