पैठण तालुक्यातील केकत-जळगाव येथील घटना
पैठण (वृत्तसंस्था ) ;– सव्वाशे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून खाऊ घातलेल्या बिस्कीटांमधून विषबाधा झाल्याची घटना पैठण तालुक्यातील केकत-जळगाव येथे सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या या चिमुकल्यांवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या या शाळेत एकूण 296 विद्यार्थी आहेत. दररोज विद्यार्थ्यांना खिचडी व पौष्टिक आहाराचे वाटप केले जाते. मात्र आज शनिवार असल्याने खिचडीऐवजी विद्यार्थ्यांना एका प्रसिद्ध कंपनीच्या बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. हे बिस्कीट खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने सुरुवातीला 50 ते 55 विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्या झाल्या. थोड्याच वेळात हे विद्यार्थी तापाने फणफणले. यामुळे धाबे दणाणलेल्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या विद्यार्थ्यावर उपचार सुरू असतानाच उलट्या आणि ताप आलेल्या आणखी 50 विद्यार्थ्यांची भर पडली. दुपारी 1 वाजेपर्यंत ही संख्या 122 एवढी झाली होती. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख नोमान व डॉ. बाबासाहेब घुगे उपचार करीत आहेत. तूर्तास या सर्वांची प्रकृती स्थिर असून काही घाबरण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.