नंदुरबारच्या तिघांविरुद्ध गुन्हा
अमळनेर (प्रतिनिधी ) : मुलाला नोकरी लावण्याचे आमिष देत पाच लाख ४० हजार रुपयांत अमळनेर येथील निवृत्त ग्रामसेवकाची फसवणूक केली. याप्रकरणी नंदुरबार येथील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त ग्रामसेवक मनोहर धोंडू पाटील (रा. पिंपळे रोड, देशमुखनगर) यांच्याकडे जुलै २०२१ मध्ये त्यांची मावस बहीण सीमा पाटील व तिचे पती सुनील विश्वासराव पाटील (रा. फकिरा शिंदेनगर, नंदुरबार) उसनवार पैसे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी तुमचा मुलगा काय करतो, असे विचारले. मुलगा बडोदा येथे कंपनीत आहे, असे सांगितल्यावर त्यांनी आमची एचएएल कंपनीत ओळख असून त्याला तेथे नोकरी लावून देतो. त्यासाठी १५ ते १६ लाख रुपये लागतील, असे सांगितले. म्हणून मनोहर पाटील यांनी नातेवाईक आहेत म्हणून विश्वास ठेवून सुनील पाटील यांच्या सांगण्यावरून २६ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांचा मुलगा निखिल याच्या धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भालेर येथील शाखेच्या खात्यावर अडीच लाख व त्यांची आई सुमनबाई विश्वासराव पाटील यांच्या खात्यावर आडीच लाख रुपये ‘आरटीजीएस’ने टाकले.पुन्हा ऑर्डर काढण्यासाठी सुनील पाटील यांनी ४० हजार रुपये मागितले. त्या बदल्यात मनोहर पाटील यांचा मुलगा ललित पाटील यांच्या इ-मेलवर एचएएल कंपनीच्या नावाने बनावट आदेश यायचे व हजर होण्यापूर्वी पुढील तारीख देण्यात येत होती.
दरम्यान लेखीपत्र आले. मात्र, त्याला नोकरी मिळालेली नाही, म्हणून मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील, सुमनबाई व निखिल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर तपास करीत आहेत.