फराज अहमद | जामनेर, दि. 21 – जामनेर ते भुसावळ दरम्यान रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्या मध्ये खड्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असुन, यामुळे रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनधारकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकांनी तसेच नागरिकांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे जामनेर भुसावळ मार्गावर गारखेडा गंगापुरी दरम्यान रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. दरम्यान खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे ? अशी परिस्थिती निर्माण झाली असून या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्डे त्वरित बुजवावीत आणि रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांनी केली आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान तर होतेच शिवाय या कसरतीत रस्त्यावर किरकोळ व लहान मोठे अपघात नित्याचे घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी गारखेडा गंगापुरी गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.