मुंबई (वृत्तसंस्था ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टलाच मिळणार आहे. याबाबत शासन दरबारी निर्णय झालेला असून १७ ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. जे अर्ज पात्र झाले आहेत, अशा महिलांना 3 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे. १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहून ऑनलाईन पद्धतीने महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.
१७ ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण, राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत.