जळगाव शहरातील घटना
जळगाव | दि..३१ जुलै २०२४ | राहत्या घरी विवाहितेने दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक ३० रोजी सायंकाळी ओमसाईनगर, आव्हाणे शिवार येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राणी श्यामकांत देशमुख (वय ४४) असे मृत विवाहितेचे नाव आहे. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण कळाले नाही. राणी देशमुख, त्यांची दोन मुले दुर्गेश, दर्शन आणि पती श्यामकांत देशमुख असे कुटुंब ओमसाईनगरात वास्तव्य करतात. देशमुख हे मुळ अडावद येथील रहिवासी आहेत. ते येथे एका कंपनीत कंपनीत कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे राणी यांचे पती मंगळवारी दि. ३० जुलै रोजी कामानिमित्त घराबाहेर गेले. दुपारी विवाहितेने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
संध्याकाळी पती घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद दिसला. त्यांनी आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता घटना समोर आली.
तत्काळ त्यांनी खबर तालुका पोलिस ठाण्यात दिली. माहिती कळताच पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह कर्मचारी रामकृष्ण इंगळे, अनिल फेगडे, अनिल मोरे यांनी धाव घेतली. विवाहितेचा मृतदेह उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. घटना कळताच मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.