जळगाव | दि.२१ जुलै २०२४ | विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्यातील हतनूर धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जाऊ शकतो, त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात सर्व यंत्रणा तत्पर ठेवलण्याच्या सुचना प्रशासनाच्या वतीने दिल्या आहेत.
जिल्ह्यातील नद्या, उपनद्या धरणे,तलाव, कालवे, खदाणी, नाले धबधबे, येथे पुराचे पाणी आणि अतिवृष्टी, ढगफुटीमुळे पाण्याची पातळी वाढून नदीकाठावरील गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी आयुश प्रसाद यांनी सर्व विभागनिहाय नियंत्रण कक्ष यांना दक्ष राहण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
तसेच तालुका निहाय शोध बचाव साहित्य, रबर बोट, बचाव पथकातील आपदा मित्र, पट्टीचे पोहणारे मित्रांनी सतर्क राहण्याचे निर्देश आहेत. आपत्कालीन शोध मदत व बचाव कार्यासाठी मदत लागल्यास या क्रमांकावर 9373789064 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.