जळगाव | दि.१५ जुलै २०२४ | मित्रांसोबत हॉटेलमधून जेवण करून घरी परतत असताना कारचा ताबा सुटल्याने कार थेट झाडावर आदळली. यात एकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी १४ जुलै रोजी दुपारी चार वाजता घडली आहे. या अपघातात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आनंद शांताराम सोनवणे (वय-३९) रा. कासमवाडी जळगाव असे मयत झालेले तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ता आनंदा सोनवणे रविवारी १४ जुलै रोजी दुपारी मित्र भैरव भगवान राणे (वय ३३), प्रवीण उर्फ पप्पू आढाव (वय ३५), योगेश भालचंद्र रेंभोटकर (वय ५५) सर्व राहणार कासमवाडी यांच्यासोबत कारने शिरसोली गावाजवळील एका हॉटेल मध्ये जेवणासाठी गेले होते. दरम्यान जेवण आटोपुन घरी येण्यासाठी निघाले असता दुपारी चार वाजेच्या सुमारास गुलाबराव देवकर कॉलेजच्या पुढे त्यांचे वाहन झाडावर धडकले. या भिषण अपघातात आनंद सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले तिघे जण गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर रस्त्याने जाणाऱ्या- येणाऱ्या वाहन चालकांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान पोलीस कर्मचारी तसेच अपघातग्रस्तांच्या मित्र नातेवाईक घटनास्थळी तात्काळ पोहोचले. दरम्यान चौघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे आनंद सोनवणे यांना मयत घोषित करण्यात आले, तर उर्वरित तिघांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मयत आनंद सोनवणे यांच्या परीवाराने आक्रोश केला. यावेळी मित्रपरिवार व नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. समाजिक कार्य करणारे आनंद सोनवणे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, दोन मुलं असा परिवार आहे.