जामनेर, ता. पहूर | दि. १४ जुलै २०२४ | खान्देश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या जळगांव -छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वरील पहूर येथे वाघुर नदीच्या पुलाचे रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी पहूर येथील पत्रकार बांधवच रस्त्यावर उतरले. यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोको आंदोलनामुळे चारही रस्त्यांवर शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना विभागाचे अभियंता संदीप पाटील यांनी सदर पुलाचे काम महिनाभरात पूर्ण करतो असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर आणि पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना शहर पत्रकार संघटनेतर्फे महामार्ग संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण कुमावत, माजी अध्यक्ष गणेश पांढरे, रवींद्र घोलप, रवींद्र लाठे, शंकर भामेरे, भानुदास चव्हाण, शांताराम झाल्टे, देवेंद्र पारळकर, संतोष पांढरे, सादिक शेख, किरण जाधव, डॉ. संभाजी क्षीरसागर, जयंत जोशी, हरिभाऊ राऊत आदी पत्रकार रस्त्यावर उतरले होते.
▪️महामार्ग प्रशासनाची लक्तरे वेशीवर..
पहूर गावचे भूमिपुत्र राज्य शासनाच्या ‘मेरी’चे सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे यांनी आंदोलनात सहभाग नोंदवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची लक्तरेच वेशीवर टांगली. ते म्हणाले ‘वेळेत काम पूर्ण करता येत नसेल तर, तुम्ही अभियंत्यांनी जीव द्यावा, सिंचन घोटाळा जसा समोर आला, तसाच मोठा घोटाळा या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांमध्ये देखील समोर येऊ शकतो. त्यांच्या ज्वलंत भावनांनी सारेच वातावरण संतप्त झाले होते.
▪️अशा आहेत मागण्या..
१) शेकडो अपघातांना आणि ३ निष्पाप जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
२) वाघुर नदीवरील पुलाचे रखडलेले काम पूर्ण करून सदर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा.
३) पुलावरील दोन्ही बाजूला रखडलेले काँक्रिटीकरण पूर्ण करून खड्ड्यांचा प्रश्न समोर निकाली काढावा.
४) पुलाच्या दोन्ही बाजूस लावलेले हायमास्ट लॅम्प सुरू करण्यात यावेत.
५) पूल परिसरात आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा कठडे बसविण्यात यावेत.
६) शाळा, महाविद्यालय, दवाखाना, पोलीस स्टेशन आदी संवेदनशील सार्वजनिक ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत.
७) बसस्थानक परिसरात गतिरोधक बसवून आवश्यक त्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात यावेत.
संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शालेय विद्यार्थी आणि निरपराध नागरिकांच्या जीवाशी आणि भावनांशीच क्रूर खेळ खेळत असून शासन आणि प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे की काय ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. पहूर पुलाचा प्रश्न एक महिन्यात सोडवावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवीण कुमावत यांनी दिला आहे. सामाजिक भावना तीव्र होऊन जनप्रक्षोभ उसळण्यापूर्वीच शासन आणि प्रशासनाने या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधून समस्या सोडवणे आवश्यक आहे.