जळगाव | दि. ०३ जुलै २०२४ | स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं. वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे रविवार दि. ७ जुलै २०२४ “विरासत” मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. ही मैफिल शहरातील कांताई सभागृहात संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
स्व. पं. वसंतराव चांदोरकर हे अभिजात संगीतात बखले घराण्याचे प्रतिनिधित्व करीत होते. देवगंधर्व भास्करबुवा बखले यांनी गायलेले राग, संगीतबद्ध केलेली नाट्यपदे, अभंग, भक्तिगीते, भावगीते, गवळणी पासून ते लावणीपर्यंतचा वारसा, किंवा विरासत चा कॅनव्हॉस पुण्याच्या दोन प्रतिभासंपन्न भगिनी शिल्पा पुणतांबेकर व सावनी दातार कुलकर्णी या उलगडून दाखविणार आहेत. त्यांना साथसंगत समीर पुणतांबेकर (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), डॉ. राजेंद्र दूरकर (पखवाज) हे करणार आहेत.
या कार्यक्रमास अनुभूती स्कूल च्या संचालिका निशा जैन व उमवी चे कॉमर्स व मॅनेजमेंट विभागाचे डिन डॉ.अनिल डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.