मुंबई | दि.०१ जुलै २०२४ | राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे. मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महानगर पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव अनूप कुमार, अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभाग प्रधान सचिव जयश्री भोज, प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह इतर विभागाचे प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये शेतकरी, महिला, बालके, युवक तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. या योजना आणि धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा सांभाळतांना सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने मी जनतेसाठी प्रामाणिपणे आणि शाश्वत काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेन, अशा शब्दात नव नियुक्त मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.