जळगाव | दि.१२ जुन २०२४ | तालुक्याच्या पश्चिमेस तसेच उत्तरेस वसलेल्या बहुतांश गावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जळगावचे माजी पालकमंत्री व राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी या भागाला भेट देऊन केळी बागांची पाहणी केली. तसेच महसूल व कृषी विभागाशी संपर्क साधून केळी बागांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याबाबतच्या व पीकविमा योजनेतून भरपाईच्या सूचना दिल्या.
मे महिन्यात सातत्याने ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्यानंतर जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळी बागा मोठ्या प्रमाणात होरपळल्या होत्या. त्या संकटातून बाहेर पडत नाही तेवढ्यात आता पावसाळ्याच्या सुरूवातीला झालेल्या वादळी वाऱ्याने उरल्यासुरल्या बागाही जमिनदोस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी खूपच हवालदिल झाले आहेत.
अशा या परिस्थितीत करंज तसेच सावखेडा येथील नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न आज माजी कृषी राज्यमंत्री देवकर यांनी केला. नुकसानग्रस्तांना हवामानावर आधारीत पीकविमा योजनेच्या माध्यमातून जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देखील माजी मंत्री देवकर याप्रसंगी दिली.
यावेळी केळी उत्पादक शेतकरी प्रकाश शेनफडू सपकाळे, प्रकाश कृष्णा पाटील तसेच हिलाल चिंतामण पाटील, योगेश भिका पाटील. रमेश भिका पाटील, विजय नवल पाटील, नितीन नारायण पाटील, कुमार संभाजी पाटील, संभाजी प्रताप पाटील, नरेंद्र रघुनाथ पाटील, छोटू मुजावर यांच्यासह जळगाव बाजार समितीचे संचालक योगराज पाटील, गोकूळ चव्हाण, वासुदेव पाटील, गणेश पाटील, केवल पाटील आदी उपस्थित होते.