जळगाव | दि.१२ जुन २०२४ | नवीन संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध उपाययोजनांचा अवलंब करून पाणी बचतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जलसंवर्धन ही चळवळ व्यापक स्वरूपात व्हावी, यात सर्वांनी पुढाकार घेऊन प्रत्येकाने प्रत्यक्षरित्या पाणी बचत करावी. तरच पुढील पिढ्यांना चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध होईल, अन्यथा भविष्यात आणखी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी वस्तुस्थिती जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी मांडली.
युनिसेफ, स्मार्ट आणि खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित रेडिओ मनभावन ९०.८ एफएम व जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवा जलसंवर्धन संमेलनात ‘हंडाजी पाणी बचाओ अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जैन हिल्सवरील सभागृहात कलश, जल पूजनाने झाला. याप्रसंगी युवराज पाटील बोलत होते. व्यासपीठावर युवराज पाटील यांच्यासह जैन हिल्सच्या कृषी विभागाचे प्रमुख संजय सोनजे, कार्यक्रमाचे संयोजक अमोल देशमुख, उद्यान विभाग प्रमुख अजय काळे, जल अभ्यासक पी. ए. पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी जल बचतीची शपथ सर्वांनी घेतली. या उपक्रमासाठी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन आणि प्रसिद्धी विभाग प्रमुख अनिल जोशी यांचे सहकार्य लाभले.
जल यौध्दा व्हा…
पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता खान्देशातही पाणी बचतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रभावी उपाययोजना व जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रेडिओ मनभावन ९०.८ एफ.एम. च्या माध्यमातून जलसंवर्धन अभियान राबवण्यात येत आहे. यानिमित्त सर्वांनी ‘ व्हाय वेस्ट ‘ ही ॲप डाऊनलोड करून पाणी बचतीच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्या आणि जल यौध्दा व्हा, असे आवाहन अमोल देशमुख यांनी केले. तसेच त्यांनी ‘ रेडिओ मनभावन’ च्या बालविवाह प्रतिबंध अभियानासह विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
पाणी शिळे होत नाही…
काही दिवसांपासून साठवलेल्या पाण्याला शिळे पाणी म्हणून फेकून दिल्या जाते; पण पाणी कधी शिळे होत नाही, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पाणी बचतीला स्वता: पासून सुरुवात करा, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. ए. पाटील यांनी केले. ज्येष्ठ गांधवादी अब्दुल भाई यांनीही पाण्याच्या वापराबाबत काही अनुभव कथन केले. सूत्रसंचालन जैन हिल्सवरील प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुलकर्णी यांनी केले.
या वेळी जैन इरिगेशन (जैन हिल्स) च्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख राजेश आगीवाल, समन्वयक सूचित जैन, मदन लाठी, अधिकारी, कर्मचारी, ‘रेडिओ मनभावन’ चे राहुल पाटील, साहिल गायकवाड आदी उपस्थित होते.