जळगाव, दि.२५ – भारतीय जनता पार्टीच्या जळगाव महानगर तर्फे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गुरूवारी आ. सुरेश भोळे (राजूमामा), ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष मिलिंद चौधरी, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, महिला मोर्चा अध्यक्षा भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थित निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०११ ला मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ओबीसी प्रवर्गामध्ये ४२ नव्या जातींचा समावेश केला. त्यापैकी ४१ जाती मुस्लिम होत्या. ओबीसींवर अन्याय करणारी ही कृती कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाने रद्द ठरत आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारने ओबीसी मूळ प्रवर्गामध्ये केलेल्या घुसखोरीला चपराक दिली आहे. उच्च न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य नाही असे जाहीर करणाऱ्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी ह्या कोर्टाचा अवमान करत असल्याने त्यांचा विरोधात भाजपातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
पश्चिम बंगालमध्यें २०१० पासून देण्यात आलेली सर्व ओबीसी प्रमाणपत्र रद्द केली असून, न्या. तपब्रत चक्रवर्ती आणि राजशेखर मंथा यांच्या खंडपीठाने ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांवर निर्णय देताना हा निकाल दिला. पश्चिम बंगाल मागासवर्गीय आयोगाने १९९३ च्या पश्चिम बंगाल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस अॅक्टच्या आधारे ओबीसींची नवीन यादी तयार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने २०१० नंतर तयार केलेली ओबीसी यादी बेकायदा असल्याचे म्हटले आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील सेवा आणि पदांसाठी २०१२ च्या कायद्यानुसार दिलेले आरक्षण बेकायदा ठरवून न्यायालयाने पश्चिम बंगालमधील अनेक वर्गाचा ओबीसी दर्जा रद्द केला आहे.
आंदोलनाप्रसंगी राजेंद्र घुगे-पाटील, राजेंद्र मराठे, किशोर चौधरी, सुनिल खडके, प्रकाश बालानी, सरोज पाठक, विनोद मराठे, संजय शिंपी, ज्योती राजपूत, नंदिनी दर्जी, अमोल धांडे, दिपक झुंझारराव, स्वप्निल चौधरी, रवींद्र सोनवणे, किरण भामरे, सचिन महाजन, मंगेश जुनागडे, भूषण बारी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.