जळगाव, दि.३१ – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदार जनजागृतीचे विविध माध्यमातून कार्यक्रम सुरु आहेत. दरम्यान आज एरंडोल येथे सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सायकल घेऊन रॅलीत सहभागी झाले. त्यामुळे इतरांमध्ये उत्साह निर्माण झाला.
एरंडोल तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले पुतळा, नागोबा मढी, मारवाडी गल्ली, भगवा चौक, मेन रोड (बाजार पेठ) मार्गे तहसील कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. तसेच विविध ठिकाणी थांबून ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. त्यांना मतदान करायला सांगून इतरांनाही प्रेरीत करण्याचे आवाहन केले.
या रॅलीत उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, पोलीस निरीक्षक संतोष गोराडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, किशोर चव्हाण, मुख्याधिकारी, न. प. पारोळा, राजेंद्र महाजन, गटशिक्षणाधिकारी, तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी दिलीप पाटील, नायब तहसीलदार बी.एस. भालेराव तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.