जळगाव, दि.२३ – शहरातील अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळेत ‘दप्तराविना शनिवार’ या उपक्रमांतर्गत ‘वाईट विचारांची होळी’ साजरी करण्यात आली. शिक्षिका स्नेहल प्रकाश ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
दरम्यान विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा, वाढलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला. तसेच होळी खेळताना नैसर्गिक व कोरड्या रंगाची होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली. यावेळी पाणी बचतीचा संदेश देखील देण्यात आला. या उपक्रमात निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व राग, द्वेष, मत्सर, व्यसन, हेवेदावे अशा अनेक दुर्गुणांचा नाश करून सर्वांशी प्रेमाने वागण्याची विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली.
याप्रसंगी अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्य सौ. बेंडाळे मॅडम अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक ललित नेमाडे, अभिनव विद्यालयाचे पर्यवेक्षक नरेंद्र चव्हाण तसेच इ.१ते ७ वी चे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.