रायगड, दि.२४ – स्वाभिमानी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तुतारी ही संघर्षासाठी प्रेरणा देणारी शक्ती ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज किल्ले रायगडावर व्यक्त केला. यावेळी पक्षाच्या तुतारी या निशाणीला छत्रपतींना समर्पित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, आ. राजेश टोपे, आ. फौजीया खान, आ. अनिल देशमुख, आ. सुमन पाटील, खा. वंदना चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, सुरेश टोकरे, माजी आ. अनिल तटकरे, मेहबूब शेख, सुलक्षणा सलगर, साधना घाणेकर, राखी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. शरद पवार म्हणाले, केंद्रातील सत्ताधारी राज्याराज्यात तसेच जनतेमध्ये तंटा निर्माण करण्याचे काम करीत आहेत. हातातील सत्ता सामान्यांच्या हिताकरता न वापरता सुरू असलेले काम बदलण्यासाठी सत्तेमध्ये परिवर्तन करावे लागेल, असे सांगितले. छत्रपती शिवरायांनी रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले होते. देशात अनेक राजे होऊन गेले. मात्र छत्रपतींनी निर्माण केलेला आदर्श आजही प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी पक्षाची निशाणी तुतारी प्रेरणा देणारी शक्ती ठरेल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
पक्षाच्या आजपासून पुढील भविष्यकाळात सर्वांच्या साथीने त्यागातून आणि कष्टातून आपण यश संपादन करू, असा विश्वास त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना देऊन पुढील वाटचालीसाठी सर्वांनी एकजूटपणे कार्यास लागावे असाच संदेश दिला. या कार्यक्रमाचा मुख्य सोहळा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. याप्रसंगी पक्षाची असलेली निशाणी छत्रपतींच्या चरणी समर्पित केली.