जळगाव, दि. १५ – शहरातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. आता डी-मार्ट पासून मोहाडी रस्त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सीआरएफ फंडातून ११ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. तर शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यांसाठी ४० कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी दिली.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याआधी या कामांना लवकरात लवकर कशी सुरुवात करता येईल यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील आमदार भोळे यांनी सांगितले.
रस्ते विकासासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने आमदार सुरेश भोळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान या पाठपुराव्याला बुधवारी यश आले असून सीआरएफ फंडातून ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.