जळगाव, दि.०९ – लोकशाहीचा नारा देत राज्यघटनेविषयी आदर दाखवून उठता बसता शाहु-फुले आंबेडकरांचे नाव घेत आणि राज्यघटना व लोकशाहीच्या नावाने गजर करत राजकारण करणाऱ्या शरद पवार यांच्या एकाधिकारशाही राजकारणाचा बुरखा निवडणूक आयोगाने पुरता फाडला असून एका व्यक्तीच्या दावणीला बांधलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची घराणेशाहीच्या राजकारणातून मुक्तता केली आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
घटना बासनात बांधून व पक्षाची ध्येयधोरणे मर्जीनुसार राबवून पक्षावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या शरद पवार यांच्या कारभारावर आयोगाने प्रकाशझोत टाकल्यामुळे पवार यांचे लोकशाही प्रेम व राज्यघटनेचा आदर बेगडी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही खासदार उन्मेश पाटील यांनी केली.
आता निवडणुकीच्या राजकारणात नव्याने सामोरे जाताना शरद पवार यांनी नव्या पक्षात पारदर्शकता व घटनात्मक शिस्तीचे पालन करावे व लोकशाहीचा आदर करावा अशी अपेक्षाही खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केल्याचे जळगाव जिल्हा प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.