जळगाव, दि.३० – ‘महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालले तर, आपण खरे असल्याचे आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता भासत नाही. खोट्याचे अनेक चेहरे असतात परंतु सत्याचा एकच चेहरा असतो असे म्हटले जाते. गांधीजींच्या सहज सोप्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार आपण करावा’ असे मोलाचे विचार रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इति पाण्डेय यांनी व्यक्त केले. गांधी तीर्थ येथील या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
महात्मा गांधी पुण्यतिथी (हुतात्मा दिनी, दि.३० जानेवारी) निमित्ताने स्वस्थ समाज व सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी व गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे “ग्राम संवाद सायकल यात्रा” आयोजण्यात आली या यात्रेस त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आरंभ झाला. निरोगी, सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. सहभागी सायकल यात्रींसह उपस्थितांना अशोक जैन यांनी स्वच्छता संबंधीत प्रतिज्ञा दिली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डाॅ. गीता धर्मपाल, डाॅ. अश्विन झाला यांची उपस्थिती होती.
या सायकल यात्रेत विविध राज्यातील आणि स्थानिक अशा ४० स्वयंसेवकांचा सहभाग आहे. १२ दिवसांच्या या यात्रेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, महिला व नागरिकांशी संवाद साधला जाईल. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील सात तालुक्यातून जवळजवळ ३५० किमीचा प्रवास या यात्रेचा असणार आहे. यात्रेत शाळा / महाविद्यालयात दोन दैनंदिन कार्यक्रम असतील तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जनजागृतीबाबत जाहीर कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे.