जळगाव, दि. १२ – आपल्या जोडीदाराची निवड डोळसपणे व पूर्ण विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखता यायला हवे. आपल्या स्वभावाप्रमाणे जोडीदार निवडताना अवास्तव अपेक्षा वा भ्रामक समजूती टाळायला हव्यात. अनेक पालकांचा असा गैरसमज असतो की एकदा लग्न झालं की पुढच्या गोष्टी आपोआप चांगल्या होतील. पण त्यामुळे लग्न झालेल्या व्यक्तींना आयुष्यभर त्रास सहन करावा लागू शकतो, असे प्रतिपादन राज्य महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह आरती नाईक यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या वतीने १२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान राज्यव्यापी युवा संकल्प अभियान राबविण्यात येते. या अभियानाचे उद्घाटन जळगावमधील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात युवती सभेच्या अंतर्गत करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, अनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, प्राचार्य प्रा. पी. आर. चौधरी, पनवेल येथील महिला विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक, वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे, महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जुगल घुगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन बडगुजर यांनी केले तर आभार डॉ. जुगल घुगे यांनी मानले.
यावेळी महाराष्ट्र अनिसचे जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे व विश्वजीत चौधरी, जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या जिल्हा कार्यवाह मीनाक्षी चौधरी, शहर शाखा कार्याध्यक्षा कल्पना चौधरी, शिरीष चौधरी, जितेंद्र धनगर आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. भारती गायकवाड़, डॉ. सुनीता चौधरी, प्रवीण जोशी, योगेश महाजन आदींनी परिश्रम घेतले.