जळगाव, दि.२९ – जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत “जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन- २०२३” पुस्तिकेचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन हे प्रकाशन अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत दरवर्षी जिल्हास्तरावर जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात येते.
या प्रकाशनात सन २०२२-२३ या वर्षातील आर्थिक व भौतिक प्रगतीची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जिल्ह्याची ठळक वैशिष्टे प्रकाशनाच्या पहिल्या भागात दिली असून दुसऱ्या भागात कृषी, उद्योग, सहकार, उर्जा, पाणी पुरवठा व स्वच्छता, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, त्याचप्रमाणे २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची माहिती आणि क्षेत्रवार जिल्हा उत्पन्न व दरडोई उत्पन्न आदी निरनिराळ्या विषयांवरील सांख्यिकी तक्ते दिले आहेत. या प्रकाशनाची प्रत पीडीएफ स्वरुपात www.mahades.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
प्रकाशनाच्या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक राजेंद्र बोरसे, सहायक संशोधन अधिकारी समीर भालेराव, सांख्यिकी सहायक प्रकाश तोमर आदी उपस्थित होते.