जळगाव, दि. १७ – शहरातील संतुलन हॉस्पिटल या खासगी रुग्णालयामध्ये झालेल्या गैर कृत्या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला १४ नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी निलेश बाविस्कर याच्या विरूध्द ४२०/२३ भादवी ३५४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान फिर्यादीच्या नातेवाईकांसह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. संशयित आरोपी निलेश ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच डॉ. चित्ते, व सहकारी डॉ. वंदना चौधरी व दवाखान्यातील इतर कर्मचारी त्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सदर प्रकरणी योग्य ती कारवाईचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले तर आमदार राजु मामा भोळे यांनी तात्काळ दखल घेत, शिष्टमंडळासमक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी गावित यांच्याशी मोबाईलवर स्पीकर ऑन करून चर्चा केली व सदरचा प्रकार अत्यंत घृणास्पद असून आरोपी विरुद्ध पोलीस कोठडी न घेतल्याने त्याचा जामीन मंजूर झाला. आता तरी त्याच्यावर गंभीर प्रकरण असल्याने स्थानिक गुन्हे शाखेमार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी विनंती केली.
यावेळी मन्यार बिरादरीचे फारुक शेख, एड. आमिर शेख, इमदादचे मतीन पटेल, शेख आबिद, अनिस शहा, अमजद खान, सलमान खान, साहिल पठाण आदी उपस्थिती होते.