जळगाव, दि. १४ – ताणतणाव मुक्तीसाठी महिलांनी स्वतःला वेळ दिला पाहिजे. तणाव आला तर स्वतःच्या भावनांना मोकळे केले पाहिजे. अनेक महिला फिगरच्या बाबत चिंता व्यक्त करून स्वतःच्या शरीराचे कुपोषण करून घेतात. मात्र त्यामुळे पोषण आहार न मिळाल्यामुळे देखील मानसिक आजारांची सुरुवात व्हायला लागते. त्यासाठी पोषक आहार नियमित घेतला पाहिजे. सुदृढ व मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम देखील केला पाहिजे, अशा अनमोल टिप्स मनोविकार तज्ज्ञानी ऑनलाइन मार्गदर्शनामधून दिल्या.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग व महिला सहभाग विभागाच्या पुढाकाराने जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या औचित्याने “वेध स्त्रीच्या दुःखाचा, जागर मानसिक आरोग्याचा” हे ऑनलाईन व्याख्यान गुरुवारी १२ ऑक्टोंबर रोजी घेण्यात आले. कार्यक्रमांमध्ये समितीचे मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाचे राज्य कार्यवाह तथा खान्देशातील मनोविकार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी आणि सहकार्यवाह, रायगड येथील मनोविकार तज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. प्रदीप जोशी म्हणाले की, गरोदर महिलांमध्ये अधिक चिंता रोग आढळतो. खरे तर स्त्रीरोग तज्ञांनी गरोदर महिलांचे डिप्रेशन तपासले पाहिजे. तसेच प्रसूतीनंतर देखील डिप्रेशन जाणवतेच. अनेक स्त्रियांना मानसिक आजार माहीत नसतात. कुटुंबातून तसेच स्त्रिया स्वतः सुद्धा आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मानसिक आजाराकडे दुर्लक्ष होणे ही सर्वात मोठी अडचण आहे. काही महिलांना सारखी चिंता करणे हा आजार दिसून येतो. स्वतःविषयी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या भविष्याविषयी चिंता वाटत असते.
ग्रामीण भागातील अनेक महिलांना तर मनातील भावना व्यक्त होत नाहीत. त्यामुळे अंगात येण्याचे प्रकार दिसून येत असतात. नोकरीच्या ठिकाणी देखील उत्तम कामगिरी करून दाखवण्याचे सातत्याने महिलांवर दडपण असते. त्यामुळे काहीतरी बेस्ट करून दाखवण्याचा प्रयत्न करताना महिला मानसिकरित्या थकून जात असते, असेही डॉ. जोशी म्हणाले.
डॉ. अनिल डोंगरे यांनी, विविध आजारांची माहिती देऊन त्यांची लक्षणे सांगितली. तसेच त्यावरील उपाय देखील समजावून सांगितले. मासिक पाळी लांबली तर चिडचिड होणे, उदास वाटणे असे अनेक त्रास होतात. तसेच पोस्ट पार्टम डिप्रेशन म्हणजेच बाळंतपणानंतर स्त्रीला हा मानसिक त्रास होतो. त्या स्त्रियांना रडू येते. आपले बाळ व्यवस्थित नाही असे वाटते. अनेकदा झोप येत नाही. हा आजार पाच टक्के स्त्रियांना दिसून येत असतो.
तसेच शेतकरी महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी दिसते. कुठल्याही स्त्रियांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करू नये. तणाव जाणवला तर विश्वासू व्यक्तीशी बोलले पाहिजे. वेळ पडले तर तज्ञांची चर्चा केली पाहिजे. महिलांना कुठेही कमी न लेखता त्यांना सन्मान देऊन, टिंगल टाळून कुटुंबीयांकडून सन्मान झाला पाहिजे, असे मत डॉ. डोगरे यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन तुळशीदास भोईटे यांनी केले तर आभार कविता मते यांनी मानले. तांत्रिक सहाय्य सिद्धेश गोसावी आणि किर्तीवर्धन तायडे यांनी केले. व्याख्यानासाठी राज्यभरातील ५०० च्या वर नागरिकांनी सहभाग नोंदविला.