जळगाव दि.०३ – महिला क्रिकेट संघाचे निवड चाचणी सामने हे पहिल्यांदाच जळगावात होत आहे. यामध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकांनी सर्वोत्तम खेळ केला तर यश नक्कीच मिळेल. पुरूषांच्या क्रिकेट प्रमाणेच आता महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी आहे. यासाठी चांगला सराव करण्याचे आवाहन करत, आवश्यक सुविधा देण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन इरिगेशन प्रयत्नशील राहिल असे प्रतिपादन उद्घाटनाप्रसंगी अशोक जैन यांनी केले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ महिला व १९ वर्षा आतील प्राथमिक क्रिकेट संघाची निवड जाहिर झाली असून त्यांचे निवड चाचणीचे सामने जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्याने सुरू प्रशिक्षण शिबिरातील निवड चाचणी सामन्यांचे उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन यांच्याहस्ते झाले. क्रीडांगण पूजन व सामन्याचा नाणेफेक सौ. ज्योती जैन यांनी केला. नविन घेतलेले मॅकेनिकल रोलर पूजन व दोन पेव्हिलियनचे फीत सोडून उद्घाटन झाले.
यावेळी त्यांच्यासोबत १९ वर्षा आतील महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) सुयश बुरकुल, वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मंदार दळवी, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, अनिल जोशी यांच्यासह भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या तेजल हसबनीस, किरण नवगीरे, अनुजा पाटील या महिला खेळाडूंची उपस्थिती होती. निवड समितीचे सदस्य रेखा गोडबोले, मनिषा लांडे, फिटनेस ट्रेनर मानसी पटवर्धन, योगिता पडियार, सहाय्यक प्रशिक्षक सोनम तांदळे, गोलंदाज प्रशिक्षक राजेश माहुरकर, फिजियो म्हणून प्रांजली पालकर, श्रेया जामदार यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती होती.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा महाराष्ट्र संघ निवडीसाठी सराव शिबीर आणि निवड चाचणी सामने १६ सप्टेंबर पर्यंत होतील. यात वरिष्ठ खेळाडू ३६ तर १९ वर्षा आतील ५० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. दोघंही स्तरातून २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
पुण्याच्या बाहेर पहिल्यांदाच सराव प्रशिक्षक शिबीराचे आयोजन केले असून एकाच छताखाली राहण्यापासून सरावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मैदानाच्या मध्यभागी अद्यावत आठ टर्फ विकेट, मैदाना बाहेर सरावासाठी तीन सिमेंट विकेट, पाच टर्फ विकेट, दोन बॉलिंग मशिन व खेळाडूंच्या फिटनेससाठी जिम अशा सुविधा महिला खेळाडूंना मिळत असल्याने त्यांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रीया मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी दिली.
राष्ट्रीयस्तरावरील निवड चाचणी स्पर्धांच्या निकषासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली व आयसीसीच्या क्रिकेट नियमाला धरून ह्या स्पर्धा खेळविल्या जात असल्याचे अरविंद देशपांडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार व अतुल जैन यांनी महिलांच्या क्रिकेट स्पर्धांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्रातील क्रिकेटचे नंदनवन असलेल्या अनुभूती स्कूलच्या या मैदानावर महिलांच्या सराव सामन्यांच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल अतुल जैन यांचे मंदार दळवी यांनी धन्यवाद मानले.