जळगाव, दि.१७ – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व् रुग्णालयात विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. नवीन ‘जीएस’ अर्थात महाविद्यालयाचा जनरल सचिव म्हणून आदिनाथ काळणार याची निवड करण्यात आली आहे. परिषदेच्या नवीन सदस्यांचा नुकताच पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. गजानन सुरेवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. अरुण कसोटे मंचावर उपस्थित होते.
प्रस्तावनेतून विद्यार्थी परिषदेविषयी डॉ. सुरेवाड यांनी माहिती सांगितली. त्यानंतर नवीन विद्यार्थी परिषद सदस्यांचे पदग्रहण अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांचे हस्ते झाले. अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी नवीन प्रतिनिधींना सदिच्छा देऊन, महाविद्यालयात आगामी काळात उत्तम उपक्रम आणि रुग्णसेवेच्या दृष्टीने उल्लेखनीय कार्य करता येईल याबाबतही विचार करा असे सांगितले.
नवीन विद्यार्थी प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजसिंग छाबरा आणि कृतिका ओसवाल यांनी केले. आभार सारंग पाटेकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, डॉक्टर्स, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद..
‘जीएस’ अर्थात महाविद्यालयाचा जनरल सचिव म्हणून आदिनाथ काळणार याची निवड झाली आहे. तर सदस्यांमध्ये क्रीडा संवर्गातून आकाश सावंत व झेबा अन्सारी, सांस्कृतिक संवर्गातून सारंग पाटेकर व सृष्टी बिऱ्हाडे, एनएसएस संवर्गातून आदिनाथ काळणार व फिजा चौधरी, एनसीसी संवर्गातून हिमांशू जगताप व पूजा मूंद, संशोधन संवर्गातून विशाल चौधरी व शीतल बलाना यांची निवड झाली आहे.