गजानन पाटील | अमळनेर, दि.02- फापोरे बु. ता.अमळनेर येथील साठवण बंधाऱ्यातून पाट्या अभावी लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने भविष्यात नदी काठावरील गावांना पाणी टंचाई निर्माण होण्याचीी शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे पाणी डोळ्यादेखत नदीतुन वाहून जात असल्याने नदी काठावरील गावातील नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
येथील साठवण बंधाऱ्यास कामाची प्रशासकीय मान्यता ही मृद व जलसंधारण विभागाकडील विशेष निधी सन 2018 – 19 या वर्षाच्या उपलब्ध झालेल्या निधीतून करण्यात आली होती. सदर लेखाशिर्ष शासनाने मार्च 2020 पासून बंद केल्यामुळे या लेखाशीर्षाखाली शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला नाही. काम ठेकेदाराने पूर्ण केलेले असून संबधीत ठेकेदाराला कामाचा मोबदला मिळत नसल्याने साठवण बंधाराच्या पाट्या टाकल्या जात नाहीत.
मागील जून, जुलै महिन्यात तालुक्यात पाऊस न झाल्याने सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला चांगला पाऊस झाला. दरम्यान तामसवाडी येथील धरण पूर्णता भरल्याने नदीत पाणी सोडण्यात आले आहे. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमूळे नदी काठावरील फापोरे बु. कन्हेरे, फापोरे खु, बिलखेडा या गावाना भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न गावातील नागरीक करीत आहे.