जळगाव, दि.२८ – ३२ व्या राज्यस्तरीय ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे शुक्रवारी थाटात उद्घाटन झाले. राज्यभरातील २६ जिल्ह्यातील तिनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक संदिप गावित यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षपदी जैन इरिगेशन सिस्टीमच्या मिडीया विभागाचे वरिष्ठ सहकारी अनिल जोशी, ताम चे महासचिव तथा सहसचिव तायक्वांडो फेडरेशन आॕफ इंडियाचे मिलिंद पठारे, तामचे उपाध्यक्ष प्रा.डाॕ.अविनाश बारगजे, जैन स्पोटर्स ॲकॕडमीचे अरविंद देशपांडे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, ताम सदस्य व्यकंटेश कररा यांची उपस्थिती होती.
सर्व मान्यवरांचे स्वागत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, महेश घारगे, जयेश बाविस्कर, अमोल थोरात, रविंद्र धर्माधिकारी यांनी केले. जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल येथे ३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो क्युरोगी व पुमसे (ज्युनिअर/सिनीयर) स्पर्धेत सहभागी खेळाडूंना पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री गावित म्हणाले की, जग अत्याधुनिक होत असताना तायक्वांडो स्पर्धा इलेक्ट्रॉनिक स्कोरींग सिस्टीम (सेन्सर्स) वर घेण्यात येत असून जळगाव सारख्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून राज्यस्तरीय स्पर्धा होत असल्याचा आनंद पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी व्यक्त केला. प्रास्तविक प्रा.डाॕ.अविनाश बारगजे यांनी केले. सुत्रसंचालन नेताजी जाधव यांनी केले. आभार व्यंकटेश कररा यांनी मानले.