जळगाव, दि.२८ – महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करणे व त्यांच्या आर्थिक उत्थानासाठी मराठी प्रतिष्ठान मोलाचे कार्य करीत आहे. सामाजिक जाणीवेतून महिलांना पिंक रिक्षेसाठी कर्ज उपलब्ध करून देऊन महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचे काम जळगाव जनता सहकारी बँकेने व मराठी प्रतिष्ठान करत आहे असे गौरोउद्गार जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी काढले. ते पिंक ऑटो रिक्षा वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
शहरातील महिलांना पिंक रिक्षा घेण्यासाठी जनता बँकेच्या वतीने अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर महिलांना पिक रिक्षा वितरीत करण्यासाठी जळगाव जनता बॅंक व मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महापौर जयश्री महाजन, डॉ. प्रविण मुंढे, प्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, बँकेचे अध्यक्ष अनिल राव, सतिष मदाने, महावीर ज्वेलर्सचे संचालक अजयकुमार ललवाणी, निर्मल सिसच्या संचालिका वैशाली सुर्यवंशी, जैन उद्योग समुहाच्या वतीने ज्योती जैन आदींसह मान्यवर उपस्थित होते.
आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनास आचार्य यांनी बँकेची स्थापना केली व त्याच संकल्पनेवर आधारीत बँकेचे कार्य आज देखिल सुरु आहे. असे उदगार बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांनी यावेळी बोलतांना काढले.
उपविभागीय परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी महिला या सबला असुन कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. रिक्षा चालवितांना कोणतीही अडचण आल्यास पोलिसांच्या वतीने सर्वांना सहकार्य मिळेल. निश्चिंत मनाने आपला व्यवसाय करा आमचा पाठींबा आहे तसेच पिंक ऑटो रिक्षा स्टॉपसाठी रेल्वे स्टेशन व बस स्टैंड असे दोन ठिकाणी थांबा राहतील असे सांगितले.
मराठी प्रतिष्ठानचे जमिल देशपांडे यांनी महिलांना स्वावलंबी करण्या मागची प्रतिष्ठानची भूमिका स्पष्ट केली व पुढील काळात जळगाव शहरात शंभर रिक्षा वितरीत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी पिंक रिक्षा घेणाऱ्या महिलांमधुन माधुरी भालेराव व माधुरी निळे यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी पुंडलिक पाटील यांनी केले.