पारोळा, दि.२० – तालुक्यातील पिंपळकोठे येथे दिनांक ९ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी पावसात बापु डीगंबर शिरसाठ (वय ४४ ) हे पाऊस सुरु झाल्याने शेतातून घरी येत असताना अंगावर वीज पडल्याने जखमी झाले होते. त्यांचा आज दिनांक २० रोजी सकाळी मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बापु शिरसाठ हे आपल्या शेतात कापूस पिकाला फवारणी करायला गेले होते. अचानक पाऊस, वादळ, विजाचा कडकडाट सुरु झाल्याने ते गावाकडे येऊ लागले. सायकलीवर असताना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांच्या मागून येत असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ धुळे येथे उपचारासाठी हलविले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी पाठविले होते. बापु शिरसाठ यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांच्या डोक्याला, कानाला फटका बसला होता. त्यांचा मेंदू, कान, एका बाजूचा हात व पाय पूर्णता निकामी झाला होता.
त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने गावातील ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ सहकार्य करुन रुग्णालायात दाखल केले. मात्र आज उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या पच्यात अपंग आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार असून बापु शिरसाठ यांची परिस्थिती हलाखीची आहे. शासनाने तात्काळ त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत देऊन सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.