जळगाव, दि.०५ – मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त संस्थेतर्फे शिक्षकांचा साडी, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षकदिना निमित्त भंडारादेखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ, जळगाव संस्थेच्या वतीने सोमवारी विद्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक, उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, सचिव मुकेश नाईक, मुख्याध्यापिका शीतल कोळी उपस्थित होते.
सुरुवातीला माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती मातेच्या फोटोला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपशिक्षिका उज्ज्वला नन्नवरे यांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगितले. दरम्यान उपक्रमशील शिक्षिका म्हणून साक्षी जोगी, दिव्या पाटील, नयना अडकमोल यांचा मान्यवरांनी सत्कार केला. शाळेतील उपशिक्षिका पूनम निकम यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांना पुस्तके भेट दिली.
यानंतर अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या वतीने विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांना साडी, पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या कामकाजावर समाधान व्यक्त करीत अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षकांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन केले.
सूत्रसंचालन शीतल कोळी यांनी तर आभार उपशिक्षक मुकेश नाईक यांनी मानले. यावेळी संस्थेच्या संचालिका स्वाती नाईक, संस्थेचे सचिव मुकेश नाईक, साधना शिरसाट, रूपाली आव्हाड, आम्रपाली शिरसाट, साक्षी जोगी, दिव्या पाटील, सोनाली जाधव, सोनाली चौधरी, पुनम निकम, कोमल पाटील, नयना अडकमोल, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे, दिनेश पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.