गजानन पाटील | अमळनेर, दि. ११ – तालुक्यातील पातोंडा येथे काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आजादी गौरव पदयात्रेच्या निमित्ताने पातोंडा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेऊन अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतातील पिकांची पाहणी केली. सोबत शिक्षक आमदार सुधीर तांबे, माजी खासदार उल्हास पाटील यांची उपस्थिती होती.
सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पातोंडा मंडळात शेती शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसाभरपाईच्या मागणीचे व शिवारातील शेतात दरवर्षी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने पाटचारीचे पाणी नेहमी साचत असल्याने त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निवेदन दिले.
यावेळी मठगव्हाण रोडवरील सुटवा नाला, पाटचारी व पावसाच्या पाण्याने भरलेल्या शेतांची पाहणी केली. खरीप हंगामातील कापूस, मुग, उडीद, मका, सोयाबीन पाण्याखाली गेल्यामुळे सडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य शासनाकडून कार्यवाही करण्याची मागणी उपस्थित अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांनी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची मदत तात्काळ मिळवून द्यावी असे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान समस्यांचे कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन थोरात यांनी दिले. यावेळी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, अमळनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, सुरेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक बी. के.सूर्यवंशी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश पाटील आदींसह परिसरातील शेतकरी, राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.