जळगाव, दि.०६ – मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये रक्षाबंधन सणानिमित्त राखी बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये पालकांसह मुलांनी त्यांची कल्पनाशक्ती व सृजनशक्ती वापरून आकर्षक पद्धतीने राख्या बनवल्या. शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.
विद्यालयामध्ये पालकांनी राखी बनवण्याचे साहित्य सोबत आणले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली राखी बनवण्याबाबतची माहिती जाणून घेतली. त्यानुसार स्वतः प्रात्यक्षिक करून बघितले. पालक व विद्यार्थ्यांचे कल्पना कौशल्य पाहून शिक्षकांनी व संस्था संचालकांनी कौतुक केले.
प्रात्यक्षिक कार्यशाळा झाल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक, संस्थेच्या संचालिका अर्चना नाईक व मुख्याध्यापिका शितल कोळी यांनी सर्व राख्यांचे परीक्षण करून निकाल तयार केला. हा निकाल राखीव ठेवण्यात आला असून लवकरच एका कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांची होती.
कार्यक्रमासाठी स्वाती नाईक, सोनाली चौधरी, प्रियंका जोगी, सोनाली जाधव, पूनम निकम, मेघा सोनवणे, जयश्री खैरनार, योगिता सोनवणे, शिल्पा कोंगे यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी व पालकांची कार्यक्रमांमध्ये उपस्थित होती.