जळगाव, दि. १८ – खान्देशातील प्रसिद्ध चित्रकार सचिन मुसळे यांच्या ‘प्रतिबिंब’ या चित्रप्रदर्शनाला जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी मंगळवारी सायंकाळी भेट दिली. रिंगरोड येथील आर्ट गॅलरीत हे चित्रप्रदर्शन सुरू आहे. सचिन मुसळे यांच्यासारखे उत्तम व अभ्यासू चित्रकार जळगावात राहतात म्हणून हे शहर मला समृद्ध वाटतं. त्यांनी देशभरातील प्रवासात प्रसिद्ध ठिकाणांचे काढलेले वॉटरकलरमधील पेंटीग्ज अनुभवण्यासारखे आहेत असं मत अशोक जैन यांनी प्रदर्शन पहातांना व्यक्त केले.
डोंगर, दऱ्या यासोबतच शेती, पाऊस, जंगल, पद्मालय, मसुरीचा धबधबा, जयपूर येथील घुमट अशा विविध उत्तम व निवडक चित्रांचे प्रदर्शन पाहतांना त्यांनी मुसळे यांच्या कलेचा गौरव केला. त्यांची चित्रशैली समजून घेत त्याबाबत याप्रसंगी चर्चाही केली. याप्रसंगी सचिन मुसळे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. हे चित्रप्रदर्शन ३० मे पर्यंत असून रसिकांसाठी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले असणार आहे.