जळगाव, दि. २७ – महाराष्ट्र अस्थिरोग संघटना दरवर्षी १ मे हा दिवस संघटनेचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त १ ते ७ मे दरम्यान अस्थिरोग व आरोग्य जनजागरण अभियान घेण्यात येणार असून यावर्षी या अभियानाची मुख्य थीम लव्ह फिटनेस अँड प्रिव्हेन्ट ऑर्थोपेडिक डिसीजेस अर्थात ‘शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहा आणि हाडांचे आजार टाळा’ अशी आहे.
दरम्यान या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जळगाव अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे, सचिव डॉ. भुषण झंवर, विभाग प्रमुख डॉ. सुनिल नाहाटा यांनी पत्रकार परिषदेत दिली. आयएमए सभागृहात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयएमए जळगावचे सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे व जनसंपर्क प्रमुख डॉ. विनोद जैन यांची उपस्थिती होती.
जळगावातील भाऊंच्या उद्यानात व्याख्यान..
बुधवार दि. ४ मे रोजी सकाळी ७ वाजता भाऊंचे उद्यान येथे जनजागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून त्यात डॉ. ज्योती गाजरे, डॉ. मनिष चौधरी, डॉ. निरंजन चव्हाण, डॉ. पराग नाहाटा आदी अनुक्रमे योगा, शस्त्रक्रियेशिवाय गुडघे दुखी टाळा, हाडांचा ठिसूळपणापासून बचाव, आधुनिक जीवन शैली काळाची गरज आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कार्यक्रमानंतर नागरिकांच्या शंकानिरसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद येथे होणार कार्यक्रमाचे उद्घाटन..
महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त औरंगाबाद येथे दि. १ मे रोजी उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोने, सचिव डॉ. नारायण कर्णे, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे सर्व राज्य कार्यकारणी सदस्य तसेच औरंगाबाद अस्थिरोग डॉ. संघटनेचे डॉ. यशवंत गाडे, डॉ. सारंग देवरे, डॉ. संतपुरे शिवकुमार, डॉ. मारुती लिंगायत, डॉ. धुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
तसेच आठवडाभर राज्यभरातील संघटनेच्या सर्व सदस्य व रुग्णांच्या जनजागरणासाठी राज्यभरातील मान्यवर डॉक्टर व विशेष तज्ञ यांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण यूट्यूब चॅनल लिंक www.orthotvonline.com यावर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यात डॉ. सुनील मारवाह, डॉ. पराग संचेती, डॉ. विजय काकतकर, डॉ. जॉन एब्नेजार, डॉ. एन जे कर्णे, योगी सत्यानंद, डॉ. राजेंद्र अभ्यंकर, डॉ. मिलिंद पत्रे, डॉ. शैलेश पानगावकर, डॉ. राहुल झांजुरणे, डॉ. श्रीकांत ताम्हाणे इत्यादी ज्येष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शक व्याख्यान होणार आहे.
तसेच राज्यभर रुग्णांचे जनजागरण अभियान, मार्गदर्शन, वृत्तपत्रात लेखाद्वारे, तसेच स्थानिक क्लब मध्ये मार्गदर्शक व्याख्यान, शिबिरे इ. भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत. सदर कार्यक्रमाचा उद्देश रुग्णांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती अर्थात फिटनेस वाढवून विविध अस्थिरोग टाळण्यासाठी व आरोग्यदायी जीवन शैली वाढवण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. या सर्व अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवून लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे, सचिव डॉ. भुषण झंवर व विभाग प्रमुख डॉ. सुनिल नाहाटा यांनी केले आहे.
VIDEO