अमळनेर, दी.०१ – प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात वाटचाल करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व सुभाष जाधव ऊर्फ भाईसाहेब यांचा आज वाढदिवस, यानिमित्ताने त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा छोटासा आढावा.
पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील संस्कारक्षम अशा जाधव परिवारात जन्मलेल्या सुभाष जाधव यांनी वडील शिक्षण महर्षी देशमुख जाधव यांचा वसा आणि वारसा समर्थपणे सांभाळत आपली चुणूक प्रशासकीय सेवेतही दाखवली. यासह त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग.स.पतपेढीच्या विश्वासहर्तेत व भरभराटीत अध्यक्ष, संचालक या पदांद्वारे सतत तीन पंचवार्षिक मध्ये भर घातली. दरम्यान अध्यक्ष पदावर असताना ग.स. सोसायटीची आर्थिक स्थिती बळकट करून त्यांच्या कार्यकाळात सभासदांना ५०४ कोटीचे कर्जवाटप केले होते. तर याच काळात ९.५० कोटी नफा सोसायटीला झाला होता. यामुळेच ग.स.सोसायटीच्या निवडणूकीत सतत तीन पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
१९९४ पासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांचा प्रशासकीय सेवेचा प्रवास सुरु झाला.११ वर्ष त्यांनी या विभागात अत्यंत पारदर्शक काम केले.त्यांच्या कामाची दखल घेत शासनाने उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविले.त्यानंतर तीन वर्षे बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर असताना एक वेगळी चुणूक त्यांनी दाखविली.त्यानंतर ते मागील बारा वर्षांपासून गटविकास अधिकारी पदावर काम पाहिले.
या प्रभावशाली कामामुळे प्रशासकिय सेवेतील त्यांच्या कार्याची दखल घेत. शासनाने त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवही केला आहे. जिल्ह्याला असलेली कुपोषणाची काळी किनार दूर सारण्यासाठी त्यांनी पुरजोर प्रयत्न केले. तसेच व्यसनमुक्तीसाठी ते सदोदीत झटत असतात. त्यातच त्यांनी चोपडा येथे बालविकास प्रकल्प अधिकारी असताना सातपुडा परिसरातील दुर्गम भागातील आदिवासी कुपोषीत मुलांसाठी कुपोषण मुक्त अभियान राबविले.
त्यानंतर भडगाव पंचायत समिती अंतर्गत गटविकास अधिकारी असताना कुपोषण अभियान यशस्वीरित्या राबवत उत्कृष्ट अधिकारी म्हणूनही पुरस्कारास पात्र ठरले होते. जिल्हा ते राज्य स्तरावर प्रशिक्षणामधुन तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केले. ते ग.स.चे संचालक, अध्यक्ष ते अखिल भारतीय बंजारा सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत, एक उत्कृष्ट शिक्षण संस्थाचालक म्हणून त्यांचे कार्य सुरू आहे.
अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या सुभाषजी जाधव यांच्या याच सकारात्मक दृष्टीकोनाने वसंतनगर ता.पारोळा सन २०२१ ग्रामपंचायत निवडणूक गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन स्वातंत्र्यानंतर प्रथमच त्यांनी पदाची लालसा न करता बिनविरोध करून गावात सलोखा राखीत विकासासाठी एक पायंडा पाडून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण करून गावाच्या विकासासाठी जोमाने सुरुवातही केली.
सर्वच क्षेत्रात यशस्वीरीत्या वाटचाल करणाऱ्या आणि सामाजिक दृष्टीकोनातून संकटात धावून जाणाऱ्या भाईसाहेब यांना दीर्घायुरोग्य लाभो, हेच निसर्गाकडे मागणे…..
विविध पुरस्कारांनी कार्यगौरव-
१)डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी पुरस्कार, सन २००५-०६ ,
२)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श अधिकारी पुरस्कार ,
३)दादोजी कोंडदेव आदर्श पुरस्कार बी.सी.बियाणी ट्रस्ट भुसावळ,
४) बंजारा भूषण पुरस्कार २०१३ , ५)महाराष्ट्र शासनाचा १००% पट नोंदणीय जिल्हास्तरीय पुरस्कार, ६)अनोखा विश्वास पुरस्कार इंदोर (मध्यप्रदेश),
७)अखिल भारतीय बंजारा रत्न पुरस्कार-२०१८
८)खानदेश सन्मान पुरस्कार २०२१
शब्दांकन- प्रा.हिरालाल पाटील (पत्रकार)
डी.डी.नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळा, वसंतनगर, ता. पारोळा.