जळगाव, दि.२६ – मानवनिर्मित संकटांना सामोरे जाण्याची क्षमता गांधी विचारांमध्येच आहे. वर्तमान परिस्थितीत गांधी विचारांची अपरिहार्यता असून मोठ्या भाऊंनी दूरदृष्टीने या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठीच गांधीतीर्थची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक दलूभाऊ जैन यांनी केले. गांधीतीर्थच्या दशकपूर्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी संस्थेच्या सुरुवातीपासून कार्यरत असलेल्या २४ सहकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ.सुदर्शन अय्यंगार, संचालिका ज्योति जैन, सल्लागार डॉ.के.बी.पाटील, गांधी संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल व जैन फार्म फ्रेश फुडस् लि. चे संचालक अथांग जैन यांची विशेष उपस्थिती होती.
आपल्या मनोगतात दलूभाऊ पुढे म्हणाले कि, गांधीजींच्या सत्य व अहिंसेचा पुरस्कार करीत व्यवसायातील साधनशुचिता सांभाळत मोठ्या भाऊंनी आपल्या जीवनाचा उत्तरार्ध व्यतीत केला. गांधीतीर्थ म्हणजे माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात सामाजिक सद्भावापोटी निर्माण झालेले अक्षरलेणे आहे, असे मोठे भाऊ म्हणत असत. गांधी विचारांचे त्यांचे स्वप्न आज गांधीतीर्थमुळे प्रत्यक्षात साकारलेले आहे. आपण सर्व या संस्थेच्या वाटचालीतील प्रमुख घटक आहात आणि आम्हास त्याचा सार्थ अभिमान आहे.
डॉ.के.बी.पाटील यांनी गांधीतीर्थच्या वाटचालीच्या आठवणींना उजाळा दिला व जैन परिवाराच्या कार्यसंस्कृतीमुळेच हे अद्भुत कार्य शक्य झाले असे गौरवोद्गार काढले. अशोक जैन यांनी कोरोना पश्चातच्या कालखंडात आपण अधिक जोमाने कार्य करीत मोठ्या भाऊंचे स्वप्न साकारण्यासाठी कटिबद्ध होऊ या असे आवाहन केले.
अथांग जैन यांनी समयोचित भाषण केले. प्रमोद जैन, निलेश पाटील, अनिलेश जगदाळे, तुषार बुंदे, विश्वजित पाटील, संतोष भिंताडे, प्रदीप मराठे, डॉ.अश्विन झाला, चंद्रशेखर पाटील, सुधीर पाटील, निवृत्ती वाघ, श्रीराम खलसे, नामदेव धनगर, अमोल भोलाणकर, राजेंद्र माळी, दगडू पाटील, निलेश कोल्हे, सुभाष भंगाळे, अमोल पाटील, सविता महाकाळ, दुर्वास नलगे, सुरेश पाटील, अशोक चौधरी व उदय महाजन या सहकाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गिरीश कुळकर्णी यांनी केले. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते.