जळगाव, दि. ०४ – घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पारोळा येथून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलंय. पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथके स्थापन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पारोळा पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ४०१/२०२१ भादवि कलम ४५७,३८० या दाखल गुन्ह्याबाबत गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली.
यात पारोळा येथील कृष्णा अभिमन वाघ (भिल), विशाल जगदिश पाटील, रोहीत सुनिल पाटील तिन्ही राहणार मेहु तालुका पारोळा यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता, गावातीलच योगेश वना चव्हाण यांच्या घराच्या किचनच्या खिडकीतुन आरोपी कृष्णा अभिमन वाघ (भिल) हा घरात उतरला व घराला आतुन लावलेली कडी उघडुन त्याचे साथिदार विशाल व रोहीत यांना घरात घेवून फिर्यादी यांचे १२०००/- रुपये रोख व विवो कंपनीचा मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली.
दरम्यान कृष्णा, विशाल, रोहीत या तिघांना ताब्यात घेवून त्यांना मुद्देमालासह पारोळा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल दशरथ पाटील, भगवान तुकाराम पाटील, राहुल मधुकर बैसाणे, सचिन प्रकाश पाटील, तांत्रीक टिम संदिप साळवे, ईश्वर पाटील, अशोक पाटील, मुरलीधर बारी यांचा पथकात समावेश होता.