जळगाव, दि.२४ – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनची स्थापना करून अभिनव गांधीविद भवरलालजी जैन ऊर्फ मोठ्याभाऊंनी सत्य, अहिंसा आणि परस्पर सहकार्य भावनेच्या आधारावर विश्व शांति प्रस्थापित करण्याचा निरंतर प्रयत्न केला. पाणी, माती आणि अपारंपारिक ऊर्जेचा उपयोग करून ग्रामीण भारत आणि कृषी क्षेत्रात त्यांनी केलेलं बहुमोल कार्य सदैव स्मरणात राहिल.
भारताची तरुणाई आदर्शांच्या शोधात आहे हे भवरलालजी जैन यांनी जाणले होते. तरुणांसाठी गांधीजींच्या शिवाय आदर्श व्यक्ती कोण असणार, गांधीजी तर आजही कालातीत प्रेरणादायी ठरलेले आहेत. या तरुणाईला त्यांच्या प्रगल्भ पण समर्पक संदेशावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. गांधीजींची शिकवण केवळ भारतातच नाही, तर जगभरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे. गांधीजींचा संदेश सार्वत्रिक आणि स्वीकार्य आहे. या उत्तुंग प्रेरणेनेतून श्रद्धेय मोठेभाऊंनी ‘खोज गांधीजीकी’ हे वैश्विक पातळीवरचे दृकश्राव्य पद्धतीचा अवलंब केलेले एक भव्य संग्रहालय, मोठे असे ग्रंथालय आणि आधुनिक असे संग्रहालय जैन हिल्स येथे साकारले आहे.
तत्कालिन महामहीम राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते २०१२ मध्ये गांधीतीर्थ जगाला समर्पित केले आहे. पुढील पिढ्यांसाठी गांधीतीर्थ हे मोठे शक्तीस्थान ठरलेले आहे. ज्यांनी गांधीतीर्थची इतक्या कल्पकतेने निर्मिती केली त्यांचा २५ फेब्रुवारी हा स्मृतिदिन असतो. त्याचे औचित्य साधून गांधी रिसर्च फौउंडेशन तर्फे ‘ग्रामीण आणि कृषी स्थिरता- आवश्यकता आणि दृष्टिकोण’ या विषयावर एनर्जी स्वराज फाउंडेशनचे संस्थापक तथा आय.आय.टी.मुंबईचे प्राध्यापक चेतन सिंह सोलंकी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. स्मृती व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पात प्राध्यापक सोलंकी यांचे व्याख्यान होणार आहे. ही व्याख्यानमाला नियोजनानुसार पुढे सुरू असणार आहे त्यातील हे प्रथम पुष्प होय.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर असतील तसेच डॉ. सुदर्शन आयंगार आणि जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांची विशेष उपस्थिती राहील. 25 फेब्रुवारी रोजी, सायं. 8 ते 9 वा. दरम्यान ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
या ऑनलाईन कार्यक्रमात फेसबुकच्या https://www.facebook.com/gandhiteerth/live तसेच युट्युबवर https://www.youtube.com/gandhiteerth आणि वेबेक्सच्या https://jains.webex.com/jains/j.php?MTID=mf0b1c513387b4af65d6ae83f7dbb7fc4 (अॅक्सेस कोड – 25584471454, पासवर्ड – Bhau2022) या द्वारे सहभागी होऊ शकता. तरी या व्हर्चुअल कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.