जळगाव, दि.२१ – ब्रेन हॅमरेज झालेल्या ९० वर्षीय रुग्णाच्या मेंदूवर जोखमीची लेफ्ट एफटीपी क्रेनियोटॉमी विथ अॅक्युट ड्युरल हेमॅटॉमा इव्हॅक्युएशन शस्त्रक्रिया डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका तज्ञांच्या अथक प्रयत्नांनी यशस्वी करण्यात आली.
रावेर येथील मेहबुब अली या ९० वर्षीय रुग्ण ओट्यावरुन तोल जाऊन खाली पडला. परिणामी मेंदूला जबर दुखापत होवून रक्तस्त्रावही झाला आणि रुग्णाची शुद्ध हरपली. तात्काळ नातेवाईकांनी डॉ.उल्हास पाटील रुग्णालय गाठले. यावेळी मेंदू व मणका तज्ञ डॉ.स्वप्नील पाटील यांनी हिस्ट्री जाणून घेत सीटी स्कॅन करण्यास सांगितले. रुग्णाला डाव्या बाजूला ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान रिपोर्टवरुन करण्यात आले. यावर शस्त्रक्रिया हाच पर्याय होता, मात्र रुग्णाचे वय जास्त असल्याने जोखीम अधिक होती. नातेवाईकांच्या संमतीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
अशा केसेसमध्ये शस्त्रक्रियेनंतर सक्सेस रेट हा कमी असतो. तरीही जोखीम स्विकारुन डॉ.स्वप्नील पाटील यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांना निवासी डॉ.शुभम मानकर, डॉ.वरुण देव यांचे सहकार्य लाभले. मेंदूवरील शस्त्रक्रिया त्यात रुग्णाचे वयही अधिक यामुळे भुलतज्ञांसमोरही मोठे आव्हानही उभे होते. केवळ शस्त्रक्रियेच्या भागापुरतीच भुल देेवून तज्ञांद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली.
वय जास्त, वेळ कमी, जोखीम अधिक..
रुग्णाचे वय जास्त होते, त्यात मेंदूला जबर मार बसल्याने रक्तस्त्रावही अधिक होता. अशा अवस्थेत रुग्णाला दाखल करुन घेत तात्काळ उपचार सुरु केले. रुग्णाचे वय जास्त असल्याने जोखीम स्विकारत कमी वेळेत शस्त्रक्रिया करणे हे खुप मोठे आव्हान होते. यात रुग्ण व्हेंटीवर जाण्याचीही शक्यता असते. मात्र शस्त्रक्रिया जलद गतीने आणि अचूकरित्या शस्त्रक्रिया पार पडली.
– डॉ.स्वप्नील पाटील, मेंदू व मणका तज्ञ